Pages

Friday, 28 May 2010

झंझावात ः युवक कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक


झंझावात' या प्रा. माधव मोरे स्मृतिग्रंथाचे मंगळवारी (ता. 18 मे 2010) अंबाजोगाईत प्रकाशन झाले आहे. यानिमित्ताने "दलित युवक आघाडी'बद्दल.


"दलित युवक आघाडी' हे परिवर्तनवादी चळवळीतील महत्त्वाचे नाव. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून उभे राहिलेले हे संघटन. रचनात्मक कार्यासाठी सतत संघर्षाचा पवित्रा. त्यामुळे संघटनेचा राज्यभर दबदबा.
भावनिकतेपेक्षा सामाजिक वास्तवाचे भान बाळगणारी कार्यकर्त्यांची भक्कम फळी. कार्यकर्त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडेही लक्ष. सामाजिक प्रश्‍न, समस्यांच्या अभ्यासासाठी कार्यकर्त्यांची शिबिरे. शिबिरात सामाजिक प्रश्‍न, समस्यांवर चर्चा. चर्चेत कार्यकर्त्यांनी बोलावे, मते मांडावीत, असा आग्रह.
प्रश्‍नांचे स्वरूप, त्याचा अभ्यास व कार्यकर्त्यांची मते लक्षात घेऊन व्यूहरचना. प्रत्येक प्रश्‍नाची वेगळी रणनीती. त्यासाठी प्रचार तंत्राचा वापर. त्यामुळे प्रश्‍नांची सोडवणूक करणे सोयीचे होई. प्रश्‍न मार्गी लागत. कार्यकर्तेही जीव ओतून काम करीत. इथे पदाधिकारी कोणीही नसे. पुढाकार घेणारा तो संयोजक. दलित युवक आघाडीच्या कामकाजात सामुदायिक कार्यावर भर. "दयुआ'ने हाताळलेले प्रश्‍न पुरोगामी तथा परिवर्तनवादी चळवळीच्या इतिहासात उल्लेखनीय ठरावेत असेच आहेत. "दयुआ'ने सामाजिक प्रश्‍नांवर संघर्षाची भूमिका कायम ठेवली. कोणत्याही प्रकरणात तडजोड केली नाही. परिणामी पोलिस व प्रशासनाच्या रोषालाही कार्यकर्त्यांना ताकदीने तोंड द्यावे लागले.
"दयुआ' 1973 नंतर चर्चेत आली. एव्हाना मराठवाड्यासह विदर्भातही संघटनेने काही कार्यक्रम नेटाने लावून धरले. दुष्काळी स्थितीत मजूर, शेतमजुरांना रोजंदारी मिळावी, यासाठी सरकारदरबारी कार्यकर्ते भिडले.
केज, अंबाजोगाई, धारूरसारख्या भागात "एक गाव, एक पाणवठा' आंदोलन नेले.
गावोगावचे मजूर, शेतमजूर संघटनेकडे येऊ लागले. पाणीप्रश्‍न, अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन कार्यकर्त्यांचीही तहसील, पोलिस ठाण्यात पायपीट वाढली. बीड जिल्ह्यातील
खळवट निमगाव, धर्मापुरी व बुलडाणा जिल्ह्यातील वढव व वाशीम (पूर्वीचा अकोला) जिल्ह्यातील कोलखेड येथील जुनाट मानसिकतेशी "दयुआ'ला दोन हात करावे लागले. काही कार्यकर्त्यांच्या प्रसंगी जिवावर बेतले. सत्ताधारी व विरोधी पक्षातील पुढारी, प्रशासनाची मानसिकता एकाच भट्टीतील. अशा अवघड स्थितीलाही संघटनेने तोंड दिले.
"दयुआ'च्या कामाचा खरा केंद्रबिंदू ठरला तो बीड जिल्हा. या जिल्ह्यात सामूहिक शेती कसण्याचा प्रयोग केज तालुक्‍यातील मांगवडगावला प्रत्यक्षात उतरला. मांगवडगावलाच पारधी समाजाचा मेळावा घेतला. समाजाच्या प्रश्‍नांची चर्चा केली. येथील शिबिर व मेळाव्यामुळे मातंग, पारधी समाजाचे युवक विधायक चळवळीत ओढले गेले. सवर्ण समाजातील युवकही पुढे आले. हा प्रयोगही राज्यातला पहिलाच. याशिवाय गाळपेऱ्याच्या जमिनी शोधून त्या मजूर, शेतमजुरांना कसायला मिळाव्यात म्हणून मोहीम राबविली. निजामाने दिलेल्या जमिनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. गायरान जमिनीसाठी आग्रही भूमिका घेतली. हा सर्व कार्यक्रम सुरू असतानाच सांस्कृतिक उपक्रमातून ग्रामीण भागातील जनतेचे प्रबोधन केले. देवस्थानाच्या जमिनी शेतमजुरांना कसण्यासाठी द्याव्यात, यासाठी आंदोलन छेडले. नामांतर आंदोलनातही संघटना अग्रेसर राहिली. हा सर्व विधायक कामांचा डोलारा हादरला तो प्रा. माधव मोरे यांच्या अपघाती निधनाने. ही घटना ता. 18 मे 1993 ची. संघटनाही थबकली. तब्बल 17 वर्षांनंतर प्रा. माधव मोरे यांच्या आठवणींना "झंझावात' या स्मृतिग्रंथातून उजाळा मिळत आहे. यासाठी प्रा. एस. के. जोगदंड, अमर हबीब, प्रा. नानासाहेब गाठाळ, लंकेश वेडे, प्रा. सुखदेव भुंबे, समीर मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. या स्मृतिग्रंथात "समर्पित जीवन'- प्रा. एस. के. जोगदंड, "अकाली आटलेला ऊर्जास्रोत'- प्रा. प्रकाश सिरसट, "वादळ'- चंद्रकांत वडमारे, "खळवट निमगावचा सामाजिक संघर्ष'- ऍड. श्‍याम तांगडे,
"बहुजनांचा सोबती'- हनुमंत उपरे काका, "प्रिय माधव'- भीमराव वाघचौरे, "आर्त आवाज'- बलभीम तरकसे, "सर!
होऊ कसा उतराई'- सुखदेव भुंबे, "प्रेरणादाई स्मृतिस्रोत!'- शांताराम पंदेरे, "सच्चा पाईक'- डॉ. डी. एस. लोहिया, "अष्टपैलू व्यक्तिमत्त्व'- प्रा. नानासाहेब जगताप (गाठाळ), "चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वहिनी'- प्रा. मंगल खिंवसरा, "कुशल संघटक'- कॉम्रेड काशीनाथ कापसे, "चळवळीतील कलावंत'- प्रा. रा. द. अरगडे, "व्यर्थ न हो बलिदान'- अमर हबीब, "देव न मानणारा देवमाणूस'- एस. एन. जोशी या समविचारी लेखक, चळवळीतील कार्यकर्ते, सहकाऱ्यांनी प्रा. माधव मोरे यांच्या सांगितलेल्या आठवणी मुळातून वाचव्यात अशाच आहेत. त्या सामाजिक चळवळीच्या अभ्यासकांसाठी पर्वणीच ठरतील.
"झंझावात' हा स्मृतिग्रंथ परिवर्तनवादी, पुरोगामी चळवळीतील युवक कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक व अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरावा असाच आहे.
------------------
काही प्रश्‍न अनुत्तरीतच
-------------------

"दयुआ' आणि "झंझावात'च्या निमित्ताने हा लेखन प्रपंच असला तरी यातून युवकांना
नवीन चळवळी उभारतांना मार्गदर्शन व्हावे, मुख्य हेतू आहे. मात्र विधायक चळवळींच्या विरुद्ध राजकीय पक्षांनी "शितयुद्ध'चालवले आहे.यात डॉ.बाबा आढाव यांनी घेतलेली भूमिका काय आहे. या चळवळींबद्दल असलेले प्रश्‍न,विधायक चळवळी असाव्यात काय; यासंदर्भात मी या पुढे लिहिणार आहे. यात आपणही सहभाग नोंदवावा.

No comments:

Post a Comment